- जीवन तणावग्रस्त झाले आहे?
- समस्या हाताळताना मनाची घालमेल होतेय? आंतरिक मनाची शक्ती - 1) ताण तणाव व्यवस्थित हाताळण्यासाठी
- आपले व आपल्या मुलांचे आंतरिक मन प्रबळ बनवायचे आहे?
- कौटुंबिक स्वस्थ बिघडत चालले आहे?
- छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत चालला आहे?
मग हा लेख नक्की वाचा
कधी लहान मुलांकडे काळजी पूर्वक पाहिलात का? किती निरागस असतात ही मुले.आपण मोठे झाल्यावर लाख रुपये खर्च केले तरी अशी निरागसता चेहऱ्यावर येऊ शकत नाही.काय कारण असेल? तर त्यांच्या आंतरिक मनाची शक्ती खूप असते.शिवाय कसल्याही प्रकारचा ताणतणाव त्यांच्या मनात नसतो.मुले जशी जशी मोठी होऊ लागतात तसे तसे त्यांच्या मनात वेगवेगळ्या कारणावरून ताण तणाव निर्माण होऊ लागतात व ही निरागसता हरवत जाते.
टेन्शन, ताण तणाव हे शब्द आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.आपण कितीही नाही म्हणालो तरी दररोज अनेक वेळा अनेक गोष्टींच टेन्शन आपल्याला येत असते.व्यक्तिपरत्वे, परिस्थिती नुसार प्रत्येकाचे टेन्शन वेगवेगळे असते.आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही.प्रत्येकाला कशाचं ना कशाचं टेन्शन असतंच.मात्र कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं व कोणत्या गोष्टीचं घेऊ नये? घ्यावं तर ते कितपत घ्यावं? या गोष्टीत प्रत्येकाची गफलत मात्र नक्की होत असते.
आपल्या आजूबाजूला अनेक जण असे आहेत जे अगदी किरकोळ गोष्टींचे टेन्शन घेत असतात.काही गोष्टी अगदी सहज साध्या असतात.आपण त्याकडे दुर्लक्ष केले तरी काही फरक पडत नाही.मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत.
जर एखाद्याच्या जीवनात ताण तणाव , दुःख नसेल तर असे आयुष्य निरास वाटायला लागते.ज्याप्रमाणे पाऊस पडून गेल्यावर आकाश निरभ्र होते, नंतर पडलेल्या उन्हाला त्यामुळेच किंमत येते. आपण प्रवास करत असताना खराब रस्ता लागतो, तो संपल्यानंतर चांगला रस्ता येतो.खरं तर तो चांगला रस्ता आहे म्हणून त्याला जास्त किंमत आहे असं नसून त्या खराब रस्त्यामुळे त्याची किंमत वाढलेली असते.अगदी त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात नुसते सुख असेल तर त्याला जास्त किंमत राहत नाही.दुःख, कष्ट, मेहनत, ताण तणाव या नंतर जर सुख अनुभवायला मिळत असेल तर नक्कीच त्याची किंमत जास्त होते.
जर आयुष्यात खूप ताण तणाव निर्माण झाला असेल तर थोडे शांत व्हा.एकांत ठिकाणी फिरायला जाऊन निवांत विचार करा.निर्माण झालेल्या समस्येतून नक्कीच बाहेर पडण्याचा पर्याय दिसेल.
काही काही वेळेस आपल्याला राग आला की आपण लगेच चिडतो.समोरच्या व्यक्तीवर रागावतो.त्यामुळे परिस्थिती अजून हाताबाहेर जाते,आपले त्या व्यक्तीशी संबंध अजून विकोपाला जातात.अशा वेळी जर काही कारणाने एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग आला असेल तर त्याचक्षणी त्याला प्रतिउत्तर देण्याऐवजी काही वेळ जाऊ द्यावा.या वेळेत तुम्ही पाणी प्या.एखादा बाहेर फेरफटका मारून या.मग निवांत खाली बसून चर्चा करा मार्ग नक्कीच निघेल.
काही वेळा परिस्थितीच अशी असते की आपण काहीच करू शकत नाही.मग त्यावर चिडून ताण घेऊन काही होणार आहे का? नाही ना.मग कशाला ताण घ्यायचा.समजा रात्रीचे तुम्ही जेवायला बसलात, अचानक लाईट गेली.अशा वेळी चिडून रागवून काही होणार आहे का? त्यापेक्षा उठून छोटा दिवा लावला तरी पुष्कळ.आपल्या आयुष्याचे पण असेच आहे.जर एखादी मोठी समस्या निर्माण झाली व आपण काहीच करू शकत नसेल तर अशा वेळी शांत राहणे फायद्याचे.
बऱ्याच वेळा आपल्याला सर्व काही समजून पण आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाही.व्यवहारात झालेले नुकसान असेल किंवा इतर गोष्टीत आर्थिक नुकसान झाले असेल तर त्यातून समजून पण बाहेर पडता येत नाही.आशा वेळी बाहेर पडण्यासाठी मनाला विरंगुळा निर्माण होईल अशा गोष्टी करायला पाहिजे.समजा आपल्याला संगीत आवडत असेल तर अशा वेळी शांत गाणी ऐकायला पाहिजे, खेळ आवडत असेल तर मित्रमंडळी सोबत जाऊन मनसोक्त खेळले पाहिजे.त्यामुळे मनावर आलेला अतिरिक्त ताण कमी होतो मन प्रसन्न वाटायला लागते.
सर्व खेळ मानवी मनाचा आहे.आपल्या मनाने मानले तर ती समस्या आहे, नाही मानले तर काहीच नाही.त्यामुळे आपण जाणीवपूर्वक आपल्या मनावर काम केले पाहिजे.दररोज सकाळी उठून शांत डोळे झाकून मन एकाग्र करण्याची सवय लावून घेतली तर खूप छान.सुरुवातीला जेवढे बसावे वाटेल तेवढे बसावे नंतर हळू हळू आपली वेळ वाढवली पाहिजे.
मनावरील ताण कमी करण्याचा अजून एक चांगला उपाय म्हणजे मौन व्रत. दररोज आपण एक वेळ निश्चित करून जमेल तसे 6 ते 7 किंवा 7 ते 8 असे एक तास कोणाशीही बोलायचे नाही.आपण नियमित आपली कामे या वेळेत करायची.मात्र तोंड पूर्ण बंद. एक शब्द सुद्धा कोणाशी बोलायचा नाही.आपण जे काम करत असू त्या कामात एकाग्र व्हायचं.जर अति महत्वाचे काम आलेच तर हातवारे करायचे मात्र आपले मौन तोडायचे नाही.घरातील महिलांसाठी हा उपाय खूप चांगला आहे.या मुळे घरात शांत, चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल.
विध्यार्थी दशेत असताना परीक्षा जवळ येऊ लागल्या की ताण निर्माण होण्यास सुरुवात होते.यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा तोंडावर असताना आजारी पडतात.त्यांचे तर शैक्षणिक नुकसान होतेच मात्र त्यांचे पालक पण ताणतनावग्रस्त होतात.अशा वेळी परीक्षेच्या दोन महिने अगोदर मुलांनी अभ्यासासोबत मनशांती साठी प्रयत्न करायला पाहिजे.वर सांगितल्या प्रमाणे सकाळी मौन करणे किंवा तासभर कोणाशी न बोलता शांत राहणे हे चांगले पर्याय आहेत.यामुळे आपल्याला मनाच्या खोल गाभाऱ्यात डोकावून पाहण्याची सवय लागेल शिवाय कितीही भयानक परिस्थिती निर्माण झाली तरी तिला सामोरे जाण्याची आंतरिक शक्ती मिळेल.
आज काल जीवनात जास्त तणाव निर्माण झाला की जीवन नकोसे वाटायला लागले आहे.बरेच जण निराशेच्या काळोख्या अंधारात हरवत चालले आहेत.अशा वेळी जीवन संपवण्याचा विचार ते करत असतात.आशा वेळी गरज असते ती तणाव सहन करण्याची आंतरिक इच्छा शक्ती.समजा आपल्या घरात दोन प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वायर आहेत.एक खराब क्वालिटी ची तर दुसरी ब्रँडेड.समजा जास्त पॉवर ची विधुत अली तर काय होईल? खराब वायर जाळून जाईल कारण ती अतिरिक्त ताण सहन नाही करू शकतं. बर हा अतिरिक्त ताण नेहमी असतो का? तर नाही.कधी कधी निर्माण होतो.आपल्या आयुष्याचे पण असेच आहे.हा अतिरिक्त ताण सहन करण्याची कला आपल्या अंगी आपल्या मुलांच्या अंगी निर्माण झाली पाहिजे.यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे.सुज्ञ पालक म्हणून आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण दखल दिली नाही पाहिजे.छोट्या समस्या त्यांना स्वतः ला सोडवू द्यायला पाहिजे.त्यातून एक वेगळी आंतरिक शक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते.पुढे अनेक मोठ्या समस्या देखील आपली मुले व्यवस्थित सोडवू शकतात.