रणांगणावर झालेला पराभव चालेल पण ..................
जीवन जगत असताना अनेक वेळा अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडतीलच असे नाही. आपण ठरवतो एक आणि घडते दुसरेच. असा अनुभव अनेकांना आला असेल. आपल्याला अनेक वेळा वेगवेगळ्या बाबतीत तडजोड ही करावीच लागते. आपण जेव्हा एखादे नवीन कार्य करण्याचा विचार करतो पण आपल्या मनात त्या कार्याबद्दल भीती वाटायला सुरुवात होते. समजा एखाद्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्या व्यवसायाबद्दल अनेक प्रश्न अगोदरच मनात येतात. ही आपल्या मनात वाटणारी भीती, मनाची झालेली चलबिचल ही आपल्यासाठी खूप घातक ठरते. आपण नवीन कार्य सुरुवातच करत नाही. अनेक जण अनेक बाबतीत अनेक गोष्टी ठरवतात मात्र सुरुवातच करत नाहीत. याला कारण असते आपल्या मनातली भीती, आपल्या मनात झालेला पराजय.
रणांगणात उतरून युद्ध करून झालेला पराभव चालेल पण रणांगणाच्या अगोदर मनात झालेला पराभव अजिबात चालणार नाही. जेव्हा एखादा पहिलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरतो व तो समोरच्या पैलवानाकडे पाहतो आणि तो खूप दिपाड असल्या नंतर मनात थोडासा घाबरतो. घाबरला की इथेच त्याचा पराभव झाला. आखाड्यात उतरून दुसऱ्या पैलवान सोबत एकाचे दोन हात करून त्याचा पराभव झालेला चालेल पण आखाड्यात उतरण्यापूर्वीच जर मनात त्याचा पराभव होत असेल तर हा मनातील पराभव कधीच मान्य असणार नाही. मनात विजय मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हे. प्रत्येकालाच जमेल असेही नाही. यासाठी लागतो तो आत्मविश्वास. स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास. हा प्रत्येकाकडे असेलच असे असे नाही. आत्मविश्वास निर्माण करणे हे कठीण बाब वाटत असली तरी अशक्य मात्र नाही. प्रयत्नपूर्वक जर आपण नित्य नेमाने एखाद्या बाबीचा सराव करत राहिलो, त्या सरावांमध्ये सातत्य ठेवलं, स्वतःमधील उणिवांचा शोध घेऊन त्या उणिवांच्या वर मात करण्याचा प्रयत्न केला तर मात्र हळूहळू का होईना पण आत्मविश्वास नक्की निर्माण होऊ शकतो. यासाठी लागते चिकाटी मनाची चिकाटी, जिद्द, संयम या सर्व गोष्टी एकत्र करून जर आपली कृती चालू ठेवली तर आत्मविश्वास स्वतःमध्ये नक्कीच निर्माण होईल.
यश मिळो अथवा न मिळो पण आपलं कार्य करत राहणं हा आपला धर्म आहे. आपण तो केलाच पाहिजे. यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जरी जीवनात अपयश आलं तरीही अपयश आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. त्यामुळे अपयशाचा विचार न करता आपण कृती केली पाहिजे. काही जण जीवनात अपयश आल्यामुळे खिन्न होतात. खचून जातात, उदास होतात पण अपयशाला सुद्धा आपण सकारात्मक घेतले पाहिजे. अपयश हे आपल्याला काहीतरी देऊन जातं. नवीन काहीतरी शिकवून जात. अपयशाने काय दिलं हे ज्याला ओळखायला येतं तो पुढच्या प्रयत्नात आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो हे मात्र नक्की आहे.
विश्वास आणि आत्मविश्वास हे दोन शब्द जरी सारखे वाटत असतील तरी त्यांच्यामध्ये भिन्नता आहे. विश्वास आपण दुसऱ्यावर दाखवलेला असतो. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, मित्र मैत्रिणी असतील किंवा समाजात वावरत असताना आपल्या संपर्कात येणारे व्यक्ती असतील आपण त्यांच्यावर दाखवलेला तो विश्वास असतो. मात्र आत्मविश्वास हा स्वतःने स्वतःवर दाखवलेला असतो. विश्वासापेक्षा आत्मविश्वास असणारी माणसं आयुष्यात सकारात्मक पद्धतीने जीवन जगत असतात. आयुष्याचा खरा आनंद घेण्याचं काम या आत्मविश्वास असणारी लोक करत असतात. आत्मविश्वास हा प्रयत्न करून स्वतःमध्ये निर्माण करू शकतो, वाढवू शकतो. अनेक वेळा व्यक्ती स्वतःची तुलना इतरांच्या सोबत करतात आणि स्वतःच्या आत्मविश्वासाला कमी करण्याचं काम करतात. अशी केलेली तुलना स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण करत असते.न्यूनगंड हा प्रत्येकाला खूप घटक असतो. तो व्यक्तीची प्रगती होऊ देत नाही. आत्मविश्वास कमी करण्यासाठी स्वतःची इतरांसोबत ची तुलना खूप घातक ठरत असते. त्यामुळे आपण आपली स्वतःची तुलना आपल्या सोबत करायला पाहिजे. माझ्यामध्ये काल काय नव्हते, माझ्यामध्ये आज काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे माझी यशाकडे वाटचाल आहे. माझी प्रगती होत आहे.
क्रमश ......................................