ग्रहणे या विषयी सविस्तर माहिती.
पूर्वीच्या काळी ग्रहण म्हटले की खूपच कुतूहलाचा विषय असायचा. ग्रहण हे शुभ किंवा अशुभ ही मानायची सुद्धा प्रथा होत्या. किंबहुना आज सुद्धा आहेत. अनेक जण ग्रहणामध्ये जेवत नाहीत. तथा कोणत्याही शुभ गोष्टी करत नाहीत. ग्रहणासंबंधी अनेक पूर्वग्रह माणसांच्या मनात आजही आहेत. अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. अनेक ठिकाणी ग्रहण संपल्यानंतर नदीत जाऊन आंघोळ करण्याची प्रथा सुद्धा अस्तित्वात आहे. मात्र सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे अंधश्रद्धेची बाब नसून या केवळ पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या खगोलीय स्थिती आहेत. या स्थितीचा सविस्तर आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.
चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचे अनुक्रमे अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा या दिवशीचे सापेक्ष स्थान हे वेगवेगळे असते. पृथ्वी - चंद्र व पृथ्वी - सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा पृथ्वीपाशी विशिष्ट अंशाचा कोन करत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकांशी काटकोन करत असतात. अमावस्येला यातील कोन हा शून्य अंशाचा होत असतो. तर पौर्णिमेला हाच कोन 180 अंशाचा होत असतो. पृथ्वीचा सूर्याभोवती चा प्रदक्षिणामार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणामार्ग एकाच पातळीत असत नाही. त्यांच्यात सुमारे 5 अंशाचा कोण तयार होत असतो. त्यामुळेच प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण दिसत नाहीत. काही पौर्णिमेस व काही अमावस्येस मात्र सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात त्यावेळीच ग्रहणे दिसू शकतात.
सूर्यग्रहण
सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडल्याचे दिसते. ही सावली दोन प्रकारची तयार होते. काही भागात दाट सावली तयार होते तर काही भागात विरळ सावली तयार होते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो.या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. ज्यावेळी सूर्यबिंब अंशतः दिसते त्यावेळच्या स्थितीत खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागात खग्रास सूर्यग्रहण दिसते. त्याचवेळी विरळ छायेत असलेल्या इतर भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसत असते.
काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूपच दूर असतो. म्हणजेच तो अपभू स्थितीत येत असतो. अशावेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचूच शकत नाही. ती अवकाशातच संपत असते. तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या बांगडी प्रमाणे दिसत असते. अशा प्रकारच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. कंकण म्हणजेच बांगडी अर्थातच कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसत असते.
सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील ते खालील प्रमाणे आहेत.
- सूर्यग्रहण अमावस्येला होते मात्र प्रत्येक अमावस्येला होईलच असे नाही.
- सूर्यग्रहणामध्ये सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येत असतात.
- खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंदाचा असतो.
चंद्रग्रहण
पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी, चंद्र एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो. त्या स्थितीत खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. काही वेळा चंद्र पूर्ण झाकण्याएवजी अंशतः झाकला जातो त्या स्थितीत खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात.
चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये
- चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होते मात्र प्रत्येक पौर्णिमेला होईलच असे नाही.
- चंद्रग्रहणावेळी सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आलेले असतात.
- खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो.
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत यात शुभ अशुभ असे काहीही नसते. केवळ सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा परिणाम आहे. अशी स्थिती नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल तयार होत असते. खगोल शास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाची घटना असते. अशावेळी ज्या भागात असे ग्रहण दिसणार असते त्या भागात जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून येत असतात. ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न ते सर्वजण मिळून करत असतात.
चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला असे म्हणत असतात. अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो. या कालावधीला शुक्लपक्ष असे म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी होत जातो. या कालावधीत कृष्ण पक्ष असे म्हणतात . हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसांचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात. पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. त्यांना प्रतिपदा द्वितीय तृतीया असे नावे दिलेली आहेत. हे दोन्ही मिळून एक महिना म्हणजेच चंद्रमास पूर्ण होतो. अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना हे कालगणना करता येत असते. ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसत असतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. या दिवशी चंद्र वर्तुळाकार भासतो. त्यानंतर दररोज चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. एका रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात.