खरा आनंद - भास आणि वास्तव
या जीवसृष्टीत प्रत्येक प्राणीमात्राला आनंद, सुख मिळत असते, पण माणसालाच तो प्रत्येक क्षणी हवा तितका मिळू शकतो.
या जीवसृष्टीमध्ये करोडो जीव अस्तित्वात आहेत. आनंद प्रत्येकाला असतो पण माणसाला तो आनंद प्रत्येक क्षणी हवा असतो. मग प्रत्येक क्षणी हवा असणारा आनंद त्याला मिळू शकतो का? तर याचे उत्तर मिळूही शकतो आणि नाही ही. हे प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळे आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची मानसिकता भिन्नभिन्न असते. त्वरित आनंद मिळावा ही प्रत्येकाची मनोकामना असते. काही जण दुखा आयुष्यात येण्याला खूप घाबरत असतात. भीतीने जास्त दुखी होतात. अंधारात गेलं तर कोणीतरी पकडेल अशीही भीती त्यांना वाटत असते. नव्या ठिकाणी गेलं तर कसं होईल.आपल्याला लोक काय म्हणतील याची धास्ती सुद्धा त्यांना असते.काही नवीन गोष्ठी करताना सुधा अनावश्यक भीती असते.
जिथे भीती असते तिथे आनंद येऊच शकत नाही. व्यक्तीने स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण केले पाहिजे. असे सामर्थ्य मिळवून देण्यासाठी अध्यात्म खूप उपयोगी ठरत असते. प्राचीन काळी माणसं जे शाप किंवा वर द्यायचे ते खरे व्हायचे असे म्हटले जाते. हे कितपत खरे किंवा खोटे याचा विचार आपण न केलेला बरा. भीतीमुळे आपले मन संकुचित होते. संकुचित मन हे यशस्वी होऊ शकत नाही. आपण आनंदाच्या मागे धावतो. आनंद पुढे पुढे धावत जाईल. तो कधीही आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण आपल्याला जी कृती आवडते ती अगदी मनातून निस्वार्थीपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण केलेली कृती यशस्वी झाली तर आपोआपच आनंद आपल्या पाठीमागे धावत येईल. त्यासाठी फक्त स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे.खऱ्या आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी संकुचित होणे थांबवता आलं पाहिजे. आपल्या मूळ अवस्थेत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे स्वीकार भाव. आपल्यासमोर जे काही येईल, जशी परिस्थिती येईल ती स्वीकारण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. जर ती परिस्थिती आपल्याला नको असेल तर आपण ती परिस्थिती बदलू शकतो का? याचा विचार करून ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर ती परिस्थिती आपल्याला बदलता येत नसेल तर मात्र स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता सुद्धा स्वतःमध्ये असली पाहिजे.मोडेल पण वाकणार नाही असा जर बाणा आपण ठेवला तर आपण खऱ्या आनंदाची प्राप्ती करू शकत नाही. किंबहुना सात्विक आनंद आपल्याला मिळू शकत नाही. परिस्थितीनुसार स्वतः लवचिक असले पाहिजे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. या उक्तीप्रमाणे स्वतः लवचिक असले पाहिजे.
आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी, प्रसंग, संधी आपल्यासमोर येत असतात. पण त्यांच्या वरच्या पोशाखात वरलीया रंगा आपण गुंतून जातो. प्रत्यक्ष महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? महत्त्वाच्या संधी कोणत्या? हे आपल्याला ओळखता येत नाही. त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. यासाठी कस लागेल तो आपल्या खऱ्या ज्ञानाचा. आपलं स्वतःच व्यक्तिमत्व आपल्याला तसं बनवता आलं पाहिजे.
रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला आज काय करायचा आहे? आपल्याला आजच्या दिवसात काय मिळवायच आहे? आपल्याला आजचा दिवस कसा घालवायचा आहे? याचा विचार सर्वप्रथम उठल्यानंतर दहा मिनिटे आपण नक्की केला पाहिजे. दिवसभरात अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. त्या संधीच सोन करण्याची धमक आपण निर्माण केली पाहिजे. मग रात्री झोपते वेळेस परत दहा मिनिट विचार केला पाहिजे की आपण आजचा दिवस कसा घालवला? आजच्या दिवसांमध्ये आपण काय साध्य केलं? आजच्या दिवसांमध्ये आपल्याला आनंद किती मिळाला? आजच्या दिवसांमध्ये आपण आनंद दुसऱ्याला किती देऊ शकलो? आपण इतरांना किती सहकार्य केले? आपल्यामुळे आज कोणाला दुःख झाले? आज दिवसभरामध्ये आपल्या कोणत्या गोष्टी बरोबर कोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या? यांचा विचार संध्याकाळी दहा मिनिटे केला पाहिजे. ज्या चुका आपल्या हातून झालेल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी होणार नाहीत याचा जर विचार केला तर अशा पद्धतीने जीवन जगत राहिलो तर आपल्याला निश्चित आनंद मिळू शकतो. आपण आनंदाची प्राप्ती करू शकतो.हा आनंद चिरकाल टिकणारा असतो. खऱ्या अर्थाने जीवन आपण जगू शकतो.
आपण नेहमी आनंदाच्या, सुखाच्या मागे धावत असतो. पण सुख आणि समाधान या दोन गोष्टी भिन्न आहेत. यातील फरक अनेक जण समजून न घेता जीवन जगत असतात. सुख हे क्षणिक असते. मात्र समाधान हे दीर्घकाळ टिकणारे असते. सुख आपल्या आंतरिक व बाह्य गोष्टीवर सुद्धा अवलंबून असते. मात्र समाधान ही मनाची अवस्था आहे. माणसाचे सुख बदलू शकते पण जर समाधान असेल तर व्यक्ती दीर्घकाळ आनंदी राहू शकतो.
उदा. दहा रुपयाची नोट सापडल्यानंतर माणूस सुखी होऊ शकतो. मात्र पुढच्या क्षणात त्याचे सुख बदलते. जर त्याच्या मनामध्ये विचारा आला ही नोट जर शंभरची असती तर...... किती चांगलं झालं असतं. म्हणजे नोट सापडल्यानंतर मिळणारे सुख जर आपण नकारार्थी विचार करत राहिलो तर ते सुख लगेच संपुष्टात येते. शंभर रुपयाची नोट सापडली असती तर किती छान झाले असते. या विचारांमध्ये दहा रुपये सापडल्याचे सुख हरवून जाते. पण दहा रुपयाची नोट सापडली यात जर समाधान मानले तर त्यापासून दीर्घकाळ आनंद मिळू शकतो.
एक गरीब माणूस आनंदी असू शकतो पण नेहमी आनंदी राहणारा माणूस कधीच गरीब असू शकत नाही. एखाद्याकडे खूप सारा पैसा असू शकतो पण तो आनंदी असेलच असे अजिबात नाही. पण त्या विपरीत एखाद्या व्यक्तीकडे काहीही पैसा नाही मात्र तो आनंदी समाधानी असू शकतो. मग या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? याचे उत्तर निश्चितच आपण सांगा की जो सतत आनंदी असतो तोच खरा श्रीमंत होय. एखाद्याकडे खूप पैसा आहे मात्र त्याची मानसिकता अस्वस्थ आहे. तो रात्रीचा व्यवस्थित झोपू शकत नाही. अनेक व्याधींनी ग्रासला गेलेला आहे. व्यवस्थित दिनचर्या असू शकत नाही. मग त्याच्याकडे असलेल्या पैशाचा उपयोगच काय? एखाद्याकडे मनाची श्रीमंती आहे तो सतत आनंदी असतो. आहे तेवढ्या मध्ये समाधानी असतो. तो जो जीवन जगतो तेच खरे जीवन. अशा व्यक्तीपासून व्याधी सुद्धा चार हात लांब असतात.
जीवनातील खरा वास्तव चिरकाल टिकणारा आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे. या जगामध्ये अनेक जण मिथ्या आनंदाच्या पाठीमागे धावत आहेत. क्षणिक सुखाच्या पाठीमागे धावत आहेत. क्षणिक सुख कसे मिळेल? याचा विचार करत आहेत. मात्र असे सुख कितीही मिळाले तरी तो व्यक्ती फक्त काही क्षणापुरता सुखी होऊ शकतो. परत तो दुःखी होऊ शकतो.
एका माणसाने फिल्म बघायला एक तिकीट काढलं. तिकीट देणाऱ्याने त्याला एकाऐवजी चुकून दोन तिकीट दिले. तिकीट जर चिकटून आली तर एखाद्यावेळी अशी चूक होऊ शकते. आता हा माणूस एका तिकिटाच्या पैशात दोन तिकीट मिळाली म्हणून अत्यंत खुश झाला. त्यांने एक तिकीट ब्लॅक मध्ये विकून सिनेमा पाहायला गेला. तो खुश होऊन विचार करू लागला आज फारच मज्जा आली. फुकटात सिनेमा तर पाहिलाच शिवाय वडापाव ही खाऊन आलो. मज्जा आली. पण आपण विचार केला तर हा आनंद खरा आहे का? हा आनंद चिरकाल टिकणारा आहे का? कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये हा विचार नक्कीच येईल की त्या समोरच्या व्यक्तीला आपण फसवून आपण आनंद प्राप्त केला आहे. जेव्हा हा विचार येईल तेव्हा तो आनंद, आनंद हा राहणारच नाही. तिथे सुरुवात होते दुःखाची. त्यामुळे असे व्यक्ती समाधानी राहू शकत नाही.
अनेक वेळा आपण पाहतो काही व्यक्ती नवीन गाडी घेतात. तर काही व्यक्ती जुन्या सेकंड हॅन्ड गाडी घेत असतात. आता यामध्ये नवीन गाडी वापरण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. त्यासाठी भलेही जास्त पैसे खर्च करावे लागत असले तरी बेहतर. मात्र काही जण कमी पैशांमध्ये सेकंड हॅन्ड गाडी घेतात. आपल्या क्षमतेप्रमाणे ती वापरतात. आज सुद्धा अनेक जण असं सेकंड हॅन्ड आनंद घेण्यामध्ये समाधान मानत आहेत. एखाद्या समोरच्या व्यक्तीला चिडवून, एखाद्याला त्रास देऊन, एखाद्याला फसवून, स्वतः आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा आनंद खूप क्षणिक असतो. याच्यानंतर येणारी अवस्था मात्र खूप वाईट असते. स्वतः मोठे होण्यासाठी अनेक जण दुसऱ्याला फसवत आहेत. त्यांना फसवून त्यांची संपत्ती स्वतः बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून त्यांना आनंदही मिळतो. मात्र हा आनंद कधीच चिरकाल टिकणारा असणार नाही. स्वतःच्या मेहनतीने कष्टाने दोन पैसे कमावलेले ते सुद्धा खूप जास्त समाधान देऊन जातील.