आर्थिक नियोजनाचे 7 नियम पाळा व मजेत जीवन जगा
जीवन जगत असताना कोणावरही कधीही आर्थिक संकट अचानक येऊ शकते. नोकरी करणारे व्यक्ती निवृत्तीनंतर जीवन जगताना अचानक अडचणी येऊ शकतात. एखाद्या कुटुंबात एखाद्या स्त्रीच्या पतीचे अकाली निधन झाल्याने एकट्याने आयुष्य जगणाऱ्या महिलांना देखील अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांना एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही किंवा अति जास्त पाऊस पडला तरी सुद्धा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा स्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक तजवीज अगोदर करणे खूप चांगले. दर महिन्याची मिळकत आपली किती आहे? आपण खर्च किती करतो? याचा लेखाजोखा मांडून काही पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेच. जीवन जगत असताना काही गोष्टी पाळल्या पाहिजे. आर्थिक नियोजन केले पाहिजे. असे नियोजन असणे आनंदी जीवन जगण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जे लोक असे नियोजन करणार नाहीत त्यांच्या आयुष्यात काही अनुचित प्रकार घडला व आर्थिक प्रश्न निर्माण झाला तर असे व्यक्ती हाताश होतात, निराश होतात. असे आपल्या सोबत होऊ नये म्हणून आपण आर्थिक नियोजनाचे 7 नियम पाळलेच पाहिजे. ते 7 नियम खालील प्रमाणे आहेत.
1) सोपे सुटसुटीत नियोजन असावे -
आपण जीवन जगत असताना आपल्याकडे जे काही पैसे येणार आहेत किंवा आपले जे काही उत्पन्न असणार आहे त्याचे अगदी सोप्या पद्धतीने सुटसुटीत नियोजन केले पाहिजे. आपले उत्पन्न, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी, एसआयपी किंवा इतर गुंतवणुकीसाठी वेगवेगळी बँक खाते असायला नको. आपली फक्त दोनच खाती ठेवली तर चांगले. एक खाते येणारी मिळकत आणि दुसरे खाते इतर बाबींसाठी असायला पाहिजे.
काही काही जणांची चार-पाच बँक खाते असतात. त्यामुळे त्यावर अनावश्यक खर्च होत असतो. त्यामुळे फक्त दोन बँक खाते ठेवून त्यावरतीच व्यवहार केलेला उत्तम. जास्त बँक खाते असतील तर आपल्याला नियोजन करण्यात समस्या निर्माण होते. आपण गोंधळून जात असतो. त्यामुळे दोन खाते ठेवणे कधीही चांगले.
2) टॅक्स मर्यादा शिकून घेतली पाहिजे -
प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या उत्पन्नानुसार शासन त्या व्यक्तीवर कर बसवत असतो. उत्पन्न वाढले की कराची रक्कम सुद्धा त्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे आपल्या उत्पन्नावर किती कर लागेल? आपल्या बँक खात्यावरील मर्यादा कशा पद्धतीने आहेत? जर आपण क्रेडिट कार्ड वापरत असेल तर त्या क्रेडिट क्रेडिट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती, त्या क्रेडिट कार्डची मर्यादा, आपल्याला पैसे परतफेड करण्याच्या पद्धती या सर्वांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.
आजचे युग हे संगणक तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. या सर्व ऑनलाईन व्यवहारांची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. आपण जर फोनपे,गुगल पे, नेट बँकिंग असे ऑनलाईन व्यवहार करत असू तर त्यासाठी लागणारे सर्व युजर आयडी पासवर्ड हे व्यवस्थित संभाळणे शिकून घेतले पाहिजे. आज आपण पेपर मध्ये अनेक वेळा वाचत असतो की ऑनलाईन फसवणूक करून आर्थिक गंडा घातलेला आहे. अनेक जण फसवायला बसलेले आहेत. त्यामुळे आपण आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी दुसऱ्यांना सांगून फसता कामा नये. आपण स्वतः परिपूर्ण असले पाहिजे. ऑनलाइन बाबींसाठी आपण इतरांवर अवलंबून राहणे टाळले पाहिजे. जर आपल्या स्वतःला काही गोष्टी येत नसतील तर त्या बाबींची माहिती करून त्या गोष्टी शिकून घेणे उत्तम आहे.
3) वेळा कधीही चुकवू नका
आपण बँक पोस्ट ऑफिस किंवा इतर ठिकाणी जर आपण पैसे गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवलेल्या पैशाची मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पैसे काढून घेतले पाहिजे. मोठी रक्कम कोणत्याही परताव्याशिवाय विनाकारण पडून आहे असे होऊ देऊ नका. प्रत्येक योजनेत ठराविक कालांतरासाठी आपल्याला पैसे काढण्याचे किंवा पुढे गुंतवण्याचे पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायांचा योग्य वापर करून आपण आपले पैसे काढून घेतले पाहिजे.
दैनंदिन व्यवहारांमध्ये सुद्धा अनेक जण अनेकांसोबत आर्थिक व्यवहार करत असतात मात्र असे व्यवहार करत असताना समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासने खूप महत्त्वाचे आहे. आपण समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला पैसे देतो. मात्र अनेक वेळा समोरील व्यक्ती विश्वासघात करत असतात. त्यामुळे असे व्यवहार करत असताना खूप काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.
4) आर्थिक बाबी शक्यतो गुप्तच ठेवा
आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो किंवा एखादा व्यवहार करत असतो. आपल्याला एखादी मिळकत असते. अशा बाबी गुप्त ठेवलेल्या कधीही चांगल्या. अशा बाबी आपल्या पुरत्या व आपल्या कुटुंबीयापुरत्याच मर्यादित ठेवल्या तर चांगली गोष्ट आहे. आपली गुंतवणूक आपली कमाई आपल्याकडील पैसे यांचा फार गवगवा करणे टाळले पाहिजे. कारण आपल्या सभोवती असणारे अनेक लोक जरी आपल्यासमोर ते चांगले बोलत असतील तरी त्यांच्या मनात आपल्याविषयी चांगले भावना असेलच असे नाही. पैशामुळे अनेकांच्या भावना बदलत असतात. गुंतवणूक पर्यायांची चर्चा करताना आपली स्वतःची रक्कम किती गुंतवायची आहे हे जाहीर करणे टाळले पाहिजे. सर्व गोष्टी स्पष्ट दुसऱ्यांना सांगणे कधीही टाळले पाहिजे. अशा बाबींची चर्चा फक्त आपण आपल्या कुटुंबातच केलेली चांगली.
5) ऐकीव गोष्टी मागे धावणे टाळा
व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. एक वर्षांमध्ये दाम दुप्पट योजना, दोन वर्षांमध्ये दाम दुप्पट योजना अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. मात्र अशा चुकीच्या प्रलोभनाच्या मागे धावणे टाळले पाहिजे. जोरदार परताव्यासाठी इतर जण काय करतात हे ऐकून त्यामागे जाण्याचा मोह टाळला पाहिजे. कमी कालावधीत जास्त परतावा जिथे असतो अशा योजना धोक्याच्या असतात. अशा बाबींच्या मागे धावणे सोडले पाहिजे. दीर्घकालीन पर्यावर विश्वास ठेवावा. आपण आपल्या गुंतवणुकीसाठी जो पर्याय निवडलेला आहे त्याचे सतत सतत मूल्यमापन करावे लागते. आपण आपल्या गुंतवणुकीसाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त पर्याय निवडले असतील तर त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून जिथे रिस्क कमी आहे अशा ठिकाणी आपली मिळकत गुंतवली पाहिजे. परतावा जास्त आहे म्हणून धोका पत्करणे चुकीचेच. भलेही परतावा कमी मिळू पण जास्त रिस्क घेणे टाळले पाहिजे.
6) काटकसरीची जीवनशैली निवडा
अनेक जण काटकसर करत असताना लाजत असतात. अनेक जणांना आपल्याकडील पैसे उधळण्याची मौजमजा करण्याची हौस असते. अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही. अनेक जण आपल्याकडे आलेल्या पैशांचा अतोनात खर्च करत असतात. अनेक प्रकारच्या चैनीच्या वस्तूमध्ये पैसे गुंतवत असतात. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ते पैसे खर्च करत असतात. मात्र भविष्यात लागणारे पैसे भविष्यात आपल्याला होणार खर्च मुलांचे शिक्षण आरोग्य यासाठी लागणारा खर्च या सर्वांचा विचार करून वायफळ खर्च करण्यापेक्षा काटकसर करून जीवन जगावे.
आपल्याकडील मिळकतीतील काही शिल्लक वाचवून ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. वायफळ होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत स्वयं मूल्यमापन करून कुठे खर्च वाचवता येतो? कुठे खर्च टाळता येतो? या बाबींचा विचार करून खर्च टाळता येण्यासारख्या ठिकाणी खर्च टाळायला पाहिजे. काहीजण मौज मजा म्हणून अनेक वेळा हॉटेलमध्ये जेवायला जातात. तिथे सुद्धा अतोनात खर्च होत असतो. मात्र सतत सतत हॉटेलमध्ये जेवायला जाण्यापेक्षा कधीतरी गेलेलं चांगलं. अनेक जण अनेक ठिकाणी वायफळ खर्च करत असतात. मात्र या बाबीचे आत्मचिंतन करून काटकसर करून तो पैसा वाचवला पाहिजे.
7) आरोग्याची काळजी घेतली पाहिजे -
आपण आपल्या आरोग्याचे काळजी घेतली पाहिजे डॉक्टरांच्या कडे जाण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे हल्ली धावपळीच्या युगामध्ये अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात किंबहुना अनेक जण स्वतःला वेळच देत नाहीत वाढत्या वयानुसार आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे आपले खाणे पिणे हे योग्य असले पाहिजे नियमित व्यायाम करणे व व्यायामाची सवय अंगीकारणे चांगले आपला उत्साह आपली उमेद सकारात्मकता कायम राहील असा प्रयत्न केला पाहिजे आपला मित्रपरिवार हा चांगला असावा यामुळे आपल्याला जगण्याची नवी उमेद मिळत असते त्यामुळे आरोग्य हीच संपत्ती या दृष्टिकोनातून आरोग्याची काळजी घेणे चांगले.