रावण राजा राक्षसांचा - समजून घेताना. भाग 1

 



       रावण राजा राक्षसांचा - समजून घेताना 

        लोकांच्या मनामध्ये रावणाविषयी अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत.खूप जन रावणाला वाईट तर काही जन चांगले देखील म्हणतात. जर रावण खरच वाईट असेल तर देवांनी त्याला चांगले वर का दिले? किंबहुना परंपरेनुसार चालत आलेल्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत. आपले कलुषित मत रावणाविषयी तयार झालेले आहे. वास्तविक रावण समजून घेत असताना अनेक पैलू मधून अनेक बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. खरंच रावण राक्षस होता का? दैत्य होता का? की रावण श्रेष्ठ होता? या बाबी आपण सविस्तर समजून घेऊयात.

       रावणाच्या वडिलांचे नाव विश्रवा हे होते. रावणाचे वडील ब्राह्मण कुळातील श्रेष्ठ ऋषी होते. रावणाच्या आईचे नाव कैकसी असे होते. तर पत्नीचे नाव मंदोदरी असे होते. रावणाला कुबेर, बिभिषन, कुंभकर्ण, अहिरावण, खर आणि  दूषण असे सहा भाऊ होते. तर शूर्पणखा आणि कुंभिनी अशा दोन बहिणी देखील होत्या. यापैकी शूर्पणखा, कुंभकर्ण आणि रावण हीच फक्त सख्खी भावंडे होती.

        दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चांगल्या वृत्तीचा,चांगल्या गोष्टींचा वाईटवृत्तीवर विजय मिळविणे हे व्यक्त करण्यासाठी रावणाची प्रतिमा दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा तयार झालेली आहे. अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. भारतात होळी पेटवून त्याच्यात वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन केले जाते. प्रत्येक जण या रूढीमध्ये सहभागी होत असतो. त्यामध्ये उत्साह आनंद आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता सर्वजण व्यक्त करतात. मात्र वास्तवात असे होते कि? कितीही चांगला व्यक्ती असला तरी तो खरंच आपल्या मधील अहंकार, द्वेष भावना किंबहुना यासारख्या अनेक दोष्यांचे दहन खरंच करतो का? हाप्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे.

      रावणाविषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे. रावणाचे खाजगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही तर ते समजून घेऊन अभ्यास करण्यासारखे जीवन राहिलेले आहे. जगाच्या इतिहासामध्ये इतके भव्य दिव्य व्यक्तिमत्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृतीचा रावणाचा पाया होता. रावण धार्मिक ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेला होता. तो सर्वात श्रेष्ठ शिवभक्त होता.  रावनाणे कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला देखील प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेवाने रावणाला अमरत्वाचा वर दिलेला होता. अमरत्व हे आज पर्यंत कुणालाही दिले गेलेले नाही. ते निसर्ग नियमांच्या एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्या इतकी श्रेष्ठ होती की ब्रह्मदेवाला देखील त्याकडे दुर्लक्ष न करता अमरत्वाचा वर रावणाला देणे भाग पडले.

       अनेक जण रावणाला दशमुख असे म्हणतात. लोक अशी कल्पना करतात की रावणाला दहा तोंडे होते. तो राक्षस होता. अशा कल्पनेमध्ये रावण आहे. परंतु खरंच रावणाला दहा तोंडे होते का? तर याचे उत्तर नाही असे आहे. दहा तोंडे याचा सांकेतिक अर्थ रावण खूप महान होता. त्याला श्रेष्ठत्वाकडे घेऊन जात असते. रावण हा अतिशय विद्वान पंडित होता. रावणाला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल आणि संपूर्ण ज्ञान अवगत होते. बुद्धिमत्तेच्या बाबतीत रावणाला तोड नव्हती. प्रत्येक विषयामध्ये एकेका विद्वानाची भौतिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये  होती. दहा पंडितांचे विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे रावणाला त्यावेळी दहा तोंडाचा असे म्हटले गेले. मात्र या जगामध्ये अनेक अविचारी लोक आहेत. अशा अविचारी लोकांनी दहा तोंडाचे संकल्पना त्याच्या असूर असण्यावर लावली, किंबहुना जोडली गेली. त्याच्या पांडित्याचे ज्ञान तर श्रीराम प्रभू यांना देखील होते. राम त्यांना आदराने महाब्राह्मण असे म्हणत असत. म्हणून जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला होता तेव्हा रामाने देखील त्यांना अभिवादन केले होते. 

          अशी एक आख्यायिका आहे की, रावणाने ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेण्यासाठी एक कठोर तप केलेला होता. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर रावनाणे त्यांना एक वर मागण्यासाठी आपले एक एक शीर कापून ब्रह्मदेवाला समर्पित करीत होता. असे 9 शीर कापून झाल्यानंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या आणि आंतरिक इच्छेवर प्रसन्न झाले. येथे जेव्हा रावण आपले शीर समर्पित करीत होता तेव्हा त्याला त्या मुखात अवगत असलेले ज्ञान, आपले पंडित्य ब्रह्मदेवाच्या चरणी समर्पित करत होता. रावण इतका महान होता कि असे कार्य दुसरं कोणीही करू शकत नाही. रावणाच्या अंगचा हा गुण दुसऱ्यासाठी सर्वस्व त्याग करणे  खूप महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर ब्रह्मदेवांनी रावणाला अमरत्व दिले. ब्रह्मदेवाने एक अमृताची कुपी रावणाला दिली आणि ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवायला सांगितली. ब्रह्मदेवाने रावणाला म्हटले फक्त तू या कुपीचे रक्षण कर तुझ्याजवळ मृत्यू फिरणार सुद्धा नाही. ही जर कुठे फुटली तरच तुझा मृत्यू ओढवेल.

         रावणाचा आपल्या स्वतःच्या आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला काही करू शकणार नाही. त्याला हानी पोहोचवणार नाही. याची संपूर्ण खात्री रावणाला होती. किंबहुना रावणाला अहंकार निर्माण झाला. या वराला  रावणाने गुपित ठेवले. फक्त एक चूक रावणाकडून झाली ती म्हणजे आपला धाकटा भाऊ बिभीषण खूप प्रेम असल्याकारणाने त्याच्यावर विश्वास ठेवून ब्रह्मदेवाने दिलेले वरदान रावणाने बिबीशन याला सांगितले. मात्र नंतर बिभीषण रावणाच्या विरोधात रामाकडे जाऊन बिभीषण याने  रामाला ते गुपित सनगितले.

         कुबेर हा रावणाचा भाऊ होता. कुबेराला देवांचा धन खजिना बाळगणारा असे समजले गेले. कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ होता. सुरुवातीला तो लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांना रावणाचे शक्ती सामर्थ्य व महान बुद्धिमत्ता यावर विश्वास होता. कुबेराची समजूत काढून सर्व राज्य रावणास दिले. त्या काळामध्ये रावणाने लंकेचे राज्य तसेच चांगल्या पद्धतीने सांभाळले. अत्यंत यशस्वी सुद्धा करून दाखवले. सर्व गोरगरीब जनता, सामान्य लोक, ऋषीमुनी हे रावणाच्या राज्यकारभारावर खुश होते. 

        रावणाने तपश्चर्या करून आपल्या तपश्चर्यावर महादेवाला देखील प्रसन्न करून घेतलेले होते. आयुष्यात इतकं सर्व काही असताना देखील रावण शेवटी पराभूत झाला याला कारण म्हणजे परस्त्रीहरणाचे वाईट कृत्य रावणाच्या हातून घडले गेले. मात्र याला कारण देखील तसेच आहे. राम आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा रावणाची बहीण शुर्पणखा हिला लक्ष्मण खूप आवडलेला असतो. त्यामुळे ती एका सुंदर महिलेचा रूप घेऊन लक्ष्मणाला आपल्या जाळ्यात अडकवते. मात्र लक्ष्मणाला जेव्हा हे समजते की ही शुर्पणखा राक्षसीन आहे. त्यामुळे लक्ष्मणाने तिचे नाक कापलेले असते. अशा अवस्थेमध्ये ती आपला भाऊ रावन यांच्याकडे येते.सर्व काही टी रावणाला सांगते. तेव्हा रावणाला खूप राग आलेला असतो. तो जाऊन सीतामातेला पळवून आणण्याचे काम करतो. त्याला आपल्या बहिणीचा बदला घ्यायचा असतो. ही रावणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असते. याच गोष्टीमुळे संपूर्ण रामायण घडले.

       अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. अनेक ठिकाणी शिवभक्त रावणाच्या शिवलिंगासह कलाकृती देखील आहे. काकीनाडा येथे रावणाचे भव्य मंदिर आहे या मंदिरात रावणाची पूजा होते. काकीनाडा आंध्रप्रदेशात आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील खानपुर भागामध्ये एका मंदिरात दहातोंडे असलेल्या रावणाची 35 फूट उंच मूर्ती असून या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते.

       लंकाधिपती रावण हे रामायणातील एक उत्तुंग भव्य दिव्य व्यक्तिमत्व होते. रावणाच्या बुद्धी चातुर्याची कल्पना रामाला होती. रावण खूप श्रेष्ठ आहे हे देखील रामाला माहिती होते. त्यामुळेच रावण जेव्हा मृत्युशय्येवर पडलेला होता तेव्हा रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की तू रावणा जवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित, जीवनाबद्दल महानता समजून घे. रावणाकडून काही ज्ञान मिळव. हे सांगितल्यानंतर लक्ष्मण रावणाकडे जातो आणि ज्ञान देण्याची विनंती करतो. परंतु रावण लक्ष्मणाला सांगतो की तू हे ज्ञान समजून घेण्यासाठी पात्र नाहीस. तू परत जा. लक्ष्मण परत रामाकडे येतो आणि सांगतो की रावण खूप गर्विष्ठ आहे. अहंकारी आहे. तो मृत्यूशय्येवर पडलेला आहे. आयुष्यातील शेवटचे काही क्षण  मोजत आहे. तरीदेखील रावणाचा अहंकार कमी झालेला नाही. यावर राम लक्ष्मणाला विचारतात की तू ज्ञान घेण्यासाठी कुठे थांबलेला होतास? तेव्हा लक्ष्मण सांगतात की मी रावणाच्या डोक्याजवळ थांबलेला होतो. तेव्हा राम लक्ष्मणाला सांगतात की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीकडून आयुष्याबद्दल ज्ञान मिळवायचे असेल, माहिती घ्यायची असेल तर त्याच्या डोक्यापाशी नाही तर त्याच्या पायाजवळ विनम्र होऊन थांबलं तरच आपल्याला ज्ञान मिळू शकते.

     ही गोष्ट आजच्या पिढीतील अनेक तरुणांना प्रेरणा ठरते. अनेक जण शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात मात्र आपल्या गुरूंचा मनातून आदर किती जण करतात? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. आपल्याला ज्ञान मिळवायचे असेल तर नक्कीच आपण विनम्र राहून आपल्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे. गुरूंचा आदर केला पाहिजे.

रावण समजून घेताना क्रमश...........